रत्नागिरी : शहरातील मांडवी भुतेनाका येथे दुचाकीवरील तरुणावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंकुश मांडवकर (रा. भुतेनाका, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव असून, त्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना सोमवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास घडली. अंकुश हा कोयता घेऊन भुतेनाका परिसरात आला होता. यावेळी त्याने दुचाकीवरून जात असलेल्या अरमान इनामदार (वय 29, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात अरमान जखमी झाला.
या प्रकरणी शहर पोलिसांनी अंकुशविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अंकुशने हल्ला कोणत्या कारणाने केला, तसेच हल्ल्यासाठी वापरलेला कोयता त्याने कुठून आणला, याबाबतचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
रत्नागिरी : मांडवी येथे तरुणावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयिताला 5 दिवसांची पोलिस कोठडी






