GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : इतिहास महाराष्ट्राचा बालरंगभूमीतर्फे स्पर्धेचे आयोजन

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी: बालरंगभूमी परिषदेतर्फे इतिहास महाराष्ट्राचा ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, ऐतिहासिक जडणघडण व्हावी आणि नाट्य, नृत्य, गायन या कलांद्वारे आपला गौरवशाली इतिहास सादर व्हावा या उदात्त हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे. वय वर्षे ५ ते १५ वयोगटातील मुले, मुली यात सहभागी होऊ शकतात. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.

ही स्पर्धा एकल आणि समूह या दोन गटांमध्ये होणार आहे. एकल गटात वय वर्षे ५ ते १० असा एक विभाग असून छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर विद्यार्थ्यांना सादरीकरण करायचे आहे. एकल गटात वय वर्षे ११ ते १५ असा दुसरा विभाग असून या विभागासाठी आणि समूह गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्म ते राज्याभिषेक असा विषय देण्यात आला आहे. एकल गटासाठी ५ मिनिटे आणि समूह गटासाठी १० मिनिटे असा सादरीकरण कालावधी असेल. नाट्य, नृत्य, गायन यांचा संगम करून सादरीकरण अपेक्षित आहे. समूह गटात कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त १० विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी १२ ऑगस्ट रोजी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आणि १३ ऑगस्ट २०२५ रोजी रत्नागिरीत दैवेज्ञ भवनात होणार आहे. प्राथमिक फेरीतून प्रावीण्य मिळवलेले प्रत्येक गटातील आणि विभागातील प्रथम २ स्पर्धक/ संघ अंतिम फेरीकरिता पात्र होतील.

अंतिम फेरी २३ आणि २४ ऑगस्ट रोजी मुंबईत घेण्यात येईल.

अंतिम फेरीत विजेत्या स्पर्धक विद्यार्थी आणि संघांना रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्रक आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात येईल. प्राथमिक आणि अंतिम स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरीत शाखेतर्फे करण्यात आले आहे. सहभागकरिता नंदकिशोर जुवेकर (8329221797), सीमा कदम (70833 91134) किंवा शौकत गोलंदाज (84089 67786) यांच्याशी संपर्क साधावा.

Total Visitor Counter

2647780
Share This Article