लांजा : नगरपंचायतीच्या प्रारूप शहर विकास योजना आराखड्याबाबत आलेल्या हरकतींवर उद्या सोमवार पासून सुनावणीला सुरूवात होणार असून ४ ते ७ ऑगस्ट या चार दिवसांत ही सुनावणी होणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर लांजा-कुवे बचाव समितीसह नागरिकांच्या पार पडलेल्या बैठकीत विकास आराखड्याला स्थगिती मिळावी या निर्णयावर ठाम राहण्याचा एकमुखी निर्धार बैठकीत घेण्यात आला.
शहर प्रारूप विकास आराखडा २७ मार्च २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. या आराखड्याबाबत हरकती घेण्याची शेवट तारीख २८ एप्रिल देण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या रोषामुळे १५ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. अखेर मुदत संपल्यानंतर विकास आराखड्या विरोधात नगरपंचायतीकडे तब्बल १५०० हरकती अर्ज आले होते.
याबाबत नेमण्यात आलेल्या त्री सदस्य समीतीकडून हरकतींवर सोमवार ४ ऑगस्ट पासून सुनावणीला सुरुवात होणार असून ४ ते ७ ऑगस्ट अशी ४ दिवस ही सुनावणी होणार आहे. सदर सुनावणी लांजा नगरपंचायतीच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहेत. या संदर्भात सुनावणी करिता नागरिकांशी पत्रव्यवहार करून संबंधितांना तारखा कळविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लांजा-कुवे बचाव समितीच्यावतीने शहर विकास आराखड्याबाबत होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरकती घेतलेल्या नागरिकांची विचार विनिमय करण्यासाठी शनिवार २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री देव चव्हाटा मंदिर येथे बैठक पार पडली.
यावेळी बैठकीत नागरिकांनी कुडाळ, जामखेड, पिंपरी-चिंचवड या ठिकाणचा विकास आराखड्याला स्थगिती मिळत असेल तर लांजा विकास आराखड्याला का नाही मिळू शकणार? असा प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे आमच्या घर आणि जमीनींवरून नांगर फिरणार असले तर शहर विकास आराखड्याला स्थगिती मिळावी या निर्णयावर ठाम राहण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
लांजा प्रारूप विकास आराखड्यावरील हरकतींवर सोमवारपासून सुनावणीला सुरुवात
