संगमेश्वर (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी, शिवणे परिसरात एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या महिला शिक्षिकेबद्दल अश्लील आणि चारित्र्यहनन करणाऱ्या अफवा पसरवून तसेच प्रमुख ग्रामस्थांच्या सार्वजनिक सभेत लैंगिक शेरेबाजी केल्याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुरंबी आणि पंचक्रोशीतील शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार १३ जून २०२५ ते २६ जून २०२५ या पंधरवड्यात घडला. पीडित शिक्षिकेने ८ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात यासंबंधी सविस्तर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी सुनील दौलत दळवी (रा. तेर्ये), संदीप विष्णू नटे (रा. ताम्हाणे) आणि संदीप जयवंत जाधव (रा. काटवली) यांनी संगनमत करून शिक्षिकेच्या विरोधात शाळेतील विद्यार्थ्यांशी वाईट संबंध असल्याच्या खोट्या आणि चारित्र्यहनन करणाऱ्या अफवा परिसरात पसरवल्या.
या गंभीर आरोपांसोबतच, २६ जून रोजी शाळा सभागृहात पंचक्रोशीतील प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आरोपी सुनील दळवी याने पीडित शिक्षिकेच्या चारित्र्यावर थेट हल्ला चढवत, अश्लील, घाणेरडी आणि महिला म्हणून लज्जा उत्पन्न करणारी लैंगिक शेरेबाजी केली, असे तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे.
शिक्षिकेच्या तक्रारीवरून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११६/२०२५ अन्वये, भारतीय दंड संहितेच्या (IPC) तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे अधिक तपास करत असून, अफवा पसरवून महिला शिक्षिकेचे सामाजिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी बुरंबी परिसरातील नागरिक करत आहेत.