चिपळूण : शहरातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या घरडा वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात ट्रेंड सेंटर येथील कार्यालयात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गिरीश बांदिवडेकर होते. यावेळी मागील वर्षाचा आर्थिक व कामकाजाचा आढावा कोषाध्यक्ष विनायक ओक यांनी सादर केला. सभासदांनी हा अहवाल एकमताने मंजूर केला.
सभेदरम्यान वाचनालयासाठी स्वतंत्र व प्रशस्त जागेची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. उपाध्यक्ष प्रकाश काणे यांनी घरडा उद्योग समूहाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत वाचनालय नव्या जागेत स्थलांतरित करण्याचा ठराव मांडला. हा ठराव उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केला. शहरातील डॉ. यतिन जाधव यांच्या भरीव आर्थिक सहकार्यामुळे व त्यांच्या नव्या जागेत वाचनालय स्थलांतरित करण्याबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले. डॉ. जाधव यांच्या योगदानाबद्दल सभेत विशेष अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी धनंजय चितळे यांनी जाधव परिवाराच्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर वाचनालयाचे नामकरण करण्याची सूचना मांडली. त्यानुसार डॉ. यतिन जाधव यांच्या मातोश्री श्रीमती विभा अरविंद जाधव तसेच वडील कै. अरविंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचनालयाचे ‘विभा अरविंद ग्रंथालय’ असे नामकरण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
सभेत नव्या कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. अध्यक्षपदी प्रकाश काणे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉ. वैशाली जाधव, कार्यवाहपदी विजय कदम, कोषाध्यक्षपदी विनायक ओक यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्रसाद रिसबुड, प्रा. विकास मेहेंदळे, डॉ. सौ. राजश्री सोमण, सौ. गौरी भोसले, सौ. मेघा बेटकर, प्रकाश गांगण आणि सुरेश चव्हाण यांचा समावेश करण्यात आला.
मावळते अध्यक्ष गिरीश बांदिवडेकर यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करत उपस्थित सभासद व मान्यवरांचे आभार मानले. सभेला डॉ. अरविंद पोतदार, सुनील खेडेकर, सतीश विरकर, राष्ट्रपाल सावंत, डॉ. माधव सोमण यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.






