GRAMIN SEARCH BANNER

अवघ्या ८ वर्षांच्या ईवा पार्टेचा समुद्रात थरारक पराक्रम; अटल सेतू ते गेटवे १७ किमी अंतर २ तास ५२ मिनिटांत पार

Gramin Varta
8 Views

डोंबिवली : जिद्द, मेहनत आणि अफाट धाडसाच्या जोरावर डोंबिवलीतील अवघ्या आठ वर्षांच्या ईवा सान्वी दिनेश पार्टे हिने अरबी समुद्रात जलतरण करत उल्लेखनीय पराक्रम आपल्या नावावर केला आहे. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे सुमारे १७ किलोमीटरचे अंतर तिने अवघ्या २ तास ५२ मिनिटांत पार करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात राहणारी ईवा गेल्या तीन महिन्यांपासून या आव्हानात्मक मोहिमेसाठी कठोर सराव करत होती. यश जिमखाना येथे प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली ती दररोज तब्बल तीन तास जलतरणाचा सराव करत होती. तिच्या या यशामागे प्रशिक्षकांसह कुटुंबीयांची भक्कम साथ लाभल्याचे सांगितले जात आहे.

ईवाने पहाटे ३ वाजता अटल सेतू परिसरातून समुद्रदेवतेची पूजा करून आपल्या जलप्रवासाला सुरुवात केली. शरीराला ग्रीस लावून आणि महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली ती समुद्रात उतरली. समुद्रातील काळोख, जहाजांची सततची वर्दळ, उसळणाऱ्या लाटा आणि पाण्यातील प्रदूषण अशा अनेक अडचणींना सामोरे जात तिने अविरतपणे पोहत प्रवास सुरू ठेवला. समुद्रात तरंगणारे प्लास्टिक, नारळ आणि अन्य कचऱ्यामुळे अनेकदा अडथळे निर्माण झाले, तरीही ईवाने जिद्दीने आपला निर्धार कायम ठेवला.

अखेर सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी तिने गेटवे ऑफ इंडिया गाठत हा विक्रम पूर्ण केला. मे महिन्यातील उष्ण आणि खडतर हवामानात समुद्रात पोहणे अत्यंत धोकादायक मानले जात असताना, एवढ्या लहान वयात ईवाने केलेल्या या पराक्रमाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचल्यानंतर तिचे आई-वडील, प्रशिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. ईवाचे पुढील लक्ष्य आणखी मोठे असून, आता ती धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल ३६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सज्ज होत आहे.

Total Visitor Counter

3364213
Share This Article