GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत अंमली पदार्थाचे सेवन करताना एकाला रंगेहाथ पकडले; पोलिसांची धडक कारवाई

Gramin Varta
47 Views

दापोली: अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत दापोली पोलिसांनी जालगाव पांगारवाडी येथे मोठी कारवाई केली असून, गांजाचे सेवन करणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र अनंत घाग (रा. पांगारवाडी, जालगाव, दापोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बळीराम बालाजी चोंडे आणि त्यांच्या पथकाला पांगारवाडी परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पांगारवाडी येथील घर क्रमांक ४५३ वर छापा टाकला. यावेळी आरोपी राजेंद्र घाग हा गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी संहिता १९८५ चे कलम ८(अ) आणि २७ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली. दापोली परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस पथकाकडून केला जात आहे.

Total Visitor Counter

3378409
Share This Article