GRAMIN SEARCH BANNER

खेड: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

Gramin Varta
3 Views

खेड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रोहन शंकर पालकर (वय २३, रा. खारी-सेसरी, ता. खेड) याला खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश पी. एन. चांगुडे यांनी हा निकाल दिला. तसेच आरोपीला विविध कलमान्वये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात पार पडली. न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील तसेच पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली आरोपी दोषी ठरवत शिक्षा सुनावली. आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी, तसेच वेगवेगळ्या कलमानुसार कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

प्रकरणातील पीडित मुलगी शालेय विद्यार्थिनी असून, कोविड काळात ऑनलाइन वर्गासाठी ती मैत्रिणीच्या घरी गेली असताना आरोपीने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी काही काळ गप्प राहिली होती. मात्र, तिच्या वर्तनात बदल जाणवल्यानंतर कुटुंबीयांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष, वैद्यकीय अहवाल आणि डीएनए अहवाल हे पुरावे न्यायालयाने महत्त्वाचे मानले. सर्व पुरावे आणि साक्षींचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. सौ. मृणाल जाडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या तपासात महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे, खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Total Visitor Counter

3364211
Share This Article