क्रेटा कारमधील चौघेही जण घटनास्थळावरून पसार
खेड: मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे गवळवाडी येथे आज एका भीषण अपघाताची घटना घडली. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने, पुढे जात असलेल्या किया कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, किया कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात कर्टेल गावचे सरपंच दिनेश चव्हाण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर किया कारमधील चालक वाहनातच अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, अपघातानंतर क्रेटा कारमधील चौघेही जण घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या अपघाताबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.






