लांजा: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सासूवर सुनेचा वार

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

लांजा: कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या ७५ वर्षीय वृद्ध सासूवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याची खळबळजनक घटना लांजा तालुक्यातील वेरवली डाफळेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलिसांनी आरोपी सून स्वाती भिकाजी पवार हिच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात सत्यवती सखाराम पवार या वृद्ध महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी सत्यवती पवार आणि आरोपी स्वाती पवार या नात्याने सासू-सून असून त्या एकाच घरात विभक्त राहतात. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वाती पवार आणि तिचा पती यांच्यात घरात मोठ्या प्रमाणावर भांडण सुरू होते. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आणि त्यांना समजावण्यासाठी सत्यवती पवार या शेजारी राहणारे बाळकृष्ण पवार यांच्यासह तिथे गेल्या होत्या. मात्र, सासू समजावायला आल्याचा राग मनात धरून स्वाती पवार हिने त्यांना शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली. रागाच्या भरात स्वातीने घरातील कोयता घेऊन सत्यवती यांच्यावर वार केला. हा वार सत्यवती यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या हाताच्या मनगटावर लागल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या.

या घटनेनंतर ७५ वर्षीय सत्यवती पवार यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी स्वाती पवार हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध सासूवर कोयत्याने हल्ला झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून लांजा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *