GRAMIN SEARCH BANNER

दापोली: अ‍ॅक्टिव्हाला मागून धडक देणाऱ्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद

दापोली: खेड-दापोली मार्गावर वाकवली येथे दुचाकीला धडक देऊन एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनचालकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. यामध्ये नरेश चंद्रकांत रुके (३५, रा. जालगाव बौद्धवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला, तर अमित अरुण माने (३५, रा. काळकाई कोंड) हे जखमी झाले आहेत.

नरेश आणि अमित हे दोघे अ‍ॅक्टिव्हा दुचाकीने खेडहून दापोलीकडे जात असताना वाकवली स्मशानभूमीसमोर मागून आलेल्या एका भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर चालक जखमींना मदत न करता वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलीस हवालदार विक्रम बरोडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १३४ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या फरार चालकाचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Total Visitor Counter

3447406
Share This Article