GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे विद्यालयात “एक मूल एक झाड” उपक्रम
विद्यार्थ्यांच्या पर्यावरणप्रेमाची सुंदर साद

सावर्डे: सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने “एक मूल एक झाड” हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण होणारे पर्यावरण असंतुलन ही गंभीर समस्या होत चालली आहे. त्यामुळे मर्यादित कुटुंब आणि जास्तीत जास्त झाडांची लागवड करणे ही काळाची गरज बनली आहे.

या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी फळवृक्षाचे किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे अशी संकल्पना मांडण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकूण सुमारे १४०० झाडांची लागवड केली आणि त्या झाडांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञाही घेतली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील हरित सेना व महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी  विशेष पुढाकार घेतला.

उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे, वृक्षारोपणाची जाणीव होणे तसेच झाडांप्रती प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करणे हा होता.

हा उपक्रम प्राचार्य राजेंद्रकुमार वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजिद चिकटे, प्रशांत सकपाळ, संदीप पवार तसेच सर्व शिक्षकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.

“एक मूल एक झाड” या उपक्रमातून पर्यावरणप्रेमाची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजावी व त्यांनी हिरवळ टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा हा शाळेचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.
विद्यार्थ्यांना झाडांचे वाटप करताना शालेय समितीचे सदस्य सुभाष शेठ मोहिरे, सुधीर महाडिक पालक शिक्षक व विद्यार्थी

Total Visitor Counter

2455624
Share This Article