रत्नागिरी : शहरातील माळनाका येथील पादचारी उड्डाणपुलाचे ‘हँगिंग आर्ट गॅलरी’मध्ये रूपांतर करण्याच्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या निर्णयावर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी तीव्र निशाणा साधला आहे. त्यांनी या कारभाराविरोधात नगरपरिषदेच्या भेटीसाठी एक उपरोधिक चित्र सादर करण्याची घोषणा करत उघड पत्र प्रसिद्ध केले आहे.
शहरातील माळनाका येथील पादचारी उड्डाणपुलाच्या ठिकाणी ‘हँगिंग आर्ट गॅलरी’ करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या कामावरून माजी नगराध्यक्ष कीर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. या निषेधार्थ त्यांनी एक उपरोधिक चित्र नगरपरिषदेला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘The Illusion of Choice’ (निवडणुकीचा आभास) असे शीर्षक असलेल्या या चित्रात एका घोड्याच्या पाठीवर बसलेले गाढव आणि त्याच्या तोंडात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र दाखवले आहे. हे चित्र नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटातील एका प्रसिद्ध दृश्यापासून प्रेरित असल्याचे कीर यांनी म्हटले आहे.
कीर यांनी आपल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, बहुतांश शहरांमध्ये मोठे सार्वजनिक पायाभूत प्रकल्प उभारण्यापूर्वी वाहतूक अभ्यास, पादचारी हालचालींचे विश्लेषण आणि नगररचना केली जाते. मात्र, रत्नागिरीत ‘आधी बांधकाम करा, नंतर त्याचे समर्थन करा आणि जर जनतेची खात्री पटली नाही, तर त्या प्रकल्पाचे ‘हँगिंग आर्ट गॅलरी’मध्ये रूपांतर करा,’ असा नवा आदर्श निर्माण झाल्याचा उपरोधिक उल्लेख त्यांनी केला आहे.
तसेच, त्यांनी शहर परिषदेला देण्यात येणारे चित्र नव्याने उभारण्यात येणाऱ्या लटकत्या आर्ट गॅलरीत प्रमुखस्थळी टांगून प्रदर्शित करावे, अशी विनंतीही केली आहे. या पत्रात चित्राचा कोणताही अधिकृत अर्थ दिलेला नसून, प्रत्येक प्रेक्षकाने त्याचा अर्थ स्वतः लावावा, असे कीर यांनी स्पष्ट केले आहे. काहींना त्यात विनोद दिसेल, काहींना उपरोध, तर काहींना सार्वजनिक धोरणे, प्राधान्यक्रम किंवा वास्तव आणि प्रतिमा यातील अंतर यावर भाष्य दिसून शकते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
रत्नागिरीतील ‘आर्ट गॅलरी’वरून माजी नगराध्यक्षांची टीका; नगरपरिषदेला उपरोधिक चित्र भेट देणार
Leave a Comment






