GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर एस.टी. स्टँडजवळ मोबाईल दुकानात चोरी ; चोरटा सीसीटीव्हीत कैद

Gramin Varta
349 Views

संगमेश्वर: संगमेश्वर येथील एस.टी. स्टँडजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५१ हजार ४९९ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळच्या दरम्यान घडली आहे. संगमेश्वर पोलिसांत याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

दत्तकृपा मोबाईल दुकान येथे ही घरफोडी झाली. तक्रारदार, चिपळूण कॉटन येथील रहिवासी आणि दत्तकृपा मोबाईलचे प्रमुख श्री राजेश तुकाराम आंबावकर (वय ४६) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यानंतर ते ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत या कालावधीत ही चोरीची घटना घडली.

संगमेश्वर ते देवरुख जाणारे रोडवर, नावडी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या लोखंडी पत्र्याच्या दुकानाच्या गाळ्यातील श्री. आंबावकर यांच्या ‘दत्तकृपा मोबाईल’ दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटरचे कुलूप लोखंडी सळीने तोडून शटर उघडले आणि आत प्रवेश केला.

या घरफोडीत दुकानातून महागडे मोबाईल आणि इतर एक्सेसरीज चोरून नेण्यात आले आहेत. चोरीस गेलेल्या मालामध्ये १८,९९९ रुपये किमतीचा एक Vivo Y31 Pro मोबाईल, १५,००० रुपये किमतीचा एक Samsung F17 मोबाईल, १३,००० रुपये किमतीचा एक Oppo K13 X मोबाईल, २,००० रुपये किमतीचा एक Jio कंपनीचा राऊटर, १,००० रुपयांची EVM कंपनीची पॉवर बँक, ७०० रुपये किमतीचे Leniya कंपनीचे ज्यूकबॉक्स आणि ८०० रुपये किमतीचे Gizmore कंपनीचे स्मार्ट वॉच यांचा समावेश आहे. असा एकूण ५१,४९९ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला आहे.

या घटनेची तक्रार श्री. आंबावकर यांनी गुरुवारी, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ७ वाजून ९ मिनिटांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गु.आर.नं. ११७/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2647924
Share This Article