GRAMIN SEARCH BANNER

डोंबिवलीत घरविक्रीच्या नावाखाली फसवणूक: संगमेश्वरच्या ठगावर गुन्हा

Gramin Search
29 Views

डोंबिवली: नवी मुंबईतील एका विकासकाने डोंबिवलीजवळील कोळे गावातील एका सदनिकेची विक्री पुणे येथील ग्राहकाला करून, नंतर तीच सदनिका दुसऱ्या व्यक्तीला विकून पाच लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी नवी मुंबईतील संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा विकासक मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर परिसरातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड (पुणे) येथे राहणाऱ्या एका नागरिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, नवी मुंबईतील विकासकाने त्यांना डोंबिवलीजवळील काटई-बदलापूर रस्त्यावरील कोळे गाव हद्दीतील एका इमारतीमधील एक सदनिका ५ लाख ९० हजार रुपयांना विकण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात रीतसर नोंदणीकृत विक्री करारनामा देखील झाला होता आणि तक्रारदाराने ५ लाख ९० हजार रुपये विकासकाला हस्तांतरित केले होते. विकासकाने लवकरच सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, ताबा मिळण्यासाठी तक्रारदाराने वारंवार तगादा लावला असता, विकासक वेळकाढूपणा करत होता. दरम्यानच्या काळात, तक्रारदाराची कोणतीही परवानगी न घेता, विकासकाने खरेदी केलेली तीच सदनिका परस्पर अन्य एका नागरिकाला कुलमुखत्यार पत्राद्वारे विकली आणि त्या नागरिकाला सदनिकेचा ताबाही दिला.
या प्रकारामुळे आपल्याला सदनिका मिळाली नाही आणि आपले गुंतवलेले पैसेही परत मिळाले नाहीत, त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. एप्रिल २०१५ ते जुलै २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3366906
Share This Article