चिपळूण :नगरपरिषद आणि महावितरण यांच्यातील आर्थिक वादाचा थेट फटका चिपळूण शहरातील नागरिकांना बसू लागला आहे. आज सकाळी महावितरणने नगर परिषदेचे तब्बल ३५ लाख रुपयांचे थकीत वीज बिल असल्याचे कारण देत पाणी पुरवठ्याच्या वीज कनेक्शनचा अचानक बंदोबस्त केला. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला.
यानंतर नगर परिषदेनेही पलटवार करत महावितरणच्या वीज वितरण उपकेंद्रावर कारवाई केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, महावितरणने शहरातील ट्रान्सफॉर्मर व वीज खांबांच्या भाडेपोटी ४५ लाख रुपये थकवले आहेत. या पार्श्वभूमीवर सायंकाळी नगर परिषद प्रशासनाने उपकेंद्र सील केले आणि कर्मचारी बाहेर काढले. त्यानंतर संपूर्ण शहराचा वीज पुरवठाही खंडित झाला.
या दुहेरी कारवाईमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिक अंधारात आणि तहानलेले राहिले आहेत. यामधून प्रशासनाच्या वादात सर्वसामान्य नागरिक भरडले जात असल्याचे संतप्त स्वर जनतेतून उमटत आहेत.
उशिरापर्यंत महावितरणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही, तसेच नगर परिषदेकडूनही मार्ग न काढल्याने परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. उपकेंद्र सील झाल्याने वीज पुरवठा पूर्ववत कसा होणार, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी तातडीने पाणी व वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनातील या वादाचा थेट फटका लोकजीवनावर बसत असल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
चिपळूण नगरपरिषद आणि महावितरणच्या वादाचा नागरिकांना फटका, शहराचा पाणीपुरवठा बंद, नागरिकांत ओरड
