रत्नागिरी: संकल्प कलामंच आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत ‘श्रावणधारा काव्यमैफिल’ हा बहारदार कार्यक्रम झाला.
स्पर्धेत सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पावसाळ्यातील श्रावणी थेंबांसारखी काव्यरसधारा रसिकांच्या अंतःकरणात झिरपत गेली. सहभागी स्पर्धकांच्या सादरीकरणाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. स्पर्धेत सौ. अर्चना देवधर यांना द्वितीय, तर वृषाली टाकळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ लेखिका सुनेत्रा जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखा युवाशक्ती प्रमुख गुरुदेव नांदगावकर यांनी विशेष मेहनत घेतली.
कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण विभाग प्रमुख अरुण मौर्य यांनी मनोगत व्यक्त करताना संकल्प कलामंचचे अध्यक्ष विनयराज उपरकर यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
संकल्प कलामंचतर्फे अध्यक्ष विनयराज उपरकर, अण्णा वायंगणकर, उपाध्यक्षा रक्षिता पालव व बाबा साळवी उपस्थित होते. अण्णा वायंगणकर यांनी स्वतःची कविता सादर करून काव्यमैफिलीची सांगता केली.
रत्नागिरीत श्रावणधारा काव्यमैफिल स्पर्धेत ऋतुजा कुळकर्णी प्रथम
