GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत ‘खरेदीदार-विक्रेता संमेलन’ उत्साहात; ५.१३ कोटींचे सामंजस्य करार

Gramin Varta
72 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी, प्रक्रियादार आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन व फणस प्रक्रिया कार्यशाळा २०२६’ काल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या संमेलनात ५.१३ कोटी रुपयांचे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले, जे जिल्ह्याच्या कृषी व्यापारासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे व उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५१० प्रकल्पांची उभारणी: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रास्ताविकात सांगितले की, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५१० प्रकल्प उभारले गेले आहेत. यामुळे केवळ रोजगार निर्मितीच झाली नाही, तर मूल्यवर्धनालाही मोठी चालना मिळाली आहे.

फणस प्रक्रियेवर भर: कोकणचा मेवा असलेल्या फणसाचे महत्त्व ओळखून, त्याचे नुकसान टाळण्यासाठी आणि मूल्यवर्धनासाठी या कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्ष श्रीमती केंद्रे यांनी हे संमेलन नवीन उद्योजकांसाठी संजीवनी असल्याचे सांगितले, तर रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा आहे. येथील शेतकरी व प्रक्रियादारांना अशा संमेलनांमुळे जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले होतील, आसे सांगून, उपाध्यक्ष श्री चाळके यांनी कृषी योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती आणि बँकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. निर्यात क्षेत्रात ‘अपेडा’ (APEDA) कडून मिळणारे प्रोत्साहन, आव्हाने आणि संधी यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

विक्रमी करार: संमेलनाच्या अंतिम सत्रात खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात थेट संवाद होऊन ५.१३ कोटींचे सामंजस्य करार झाले.या संमेलनाला जिल्ह्यातील ५०० हून अधिक शेतकरी, प्रक्रियादार आणि खरेदीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे नजीकच्या काळात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कृषी मालाची निर्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.

Total Visitor Counter

3375727
Share This Article