GRAMIN SEARCH BANNER

सीपीआर रुग्णालय नूतनीकरणाच्या अंतिम टप्प्यात; महाराष्ट्रदिनी लोकार्पणाची तयारी

Gramin Varta
3 Views

कोल्हापूर: छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सी.पी.आर.) चे नूतनीकरण कार्य पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आले असून, एप्रिल अखेर सर्व कामे पूर्ण करून एक मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकार्पण करण्याची तयारी सुरू आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला याबाबत निर्देश दिले असून, कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचे आश्वासन दिले.

मंत्री मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमधील सी.पी.आर. परिसरासह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक – कागल, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय – मौजे सांगाव, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय – पिंपळगाव खुर्द, तसेच शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय – उत्तुर या संस्थांची आढावा बैठक घेतली.

बैठकीत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, “शेंडा पार्कमधील वैद्यकीय परिसर पाहिल्यानंतर परदेशातील प्रगत वैद्यकीय संकुलाची जाणीव होते. संपूर्ण संकुल विकसित होईपर्यंत अंदाजे तीन हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होईल.”

सी.पी.आर. रुग्णालयाच्या इमारतींसह भौतिक सेवासुविधा व यंत्रसामुग्रीसाठी २०० कोटींच्या निधीतून नूतनीकरण करण्यात आले आहे. मुख्य हेरिटेज इमारतीसह दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व सरस्वती इमारतींच्या नूतनीकरणाची मोठी कामे पूर्ण झाली आहेत. हॉस्पिटलच्या आवारातील काँक्रीट रस्त्यांची कामे, आठ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, आठ निवारा शेड्स आणि बाह्यरुग्ण विभागाचा दुसरा मजला अंतिम टप्प्यात आले आहेत.

सदानंद भिसे यांनी माहिती दिली की, प्रशासकीय इमारती, ऑडिटोरियम, शवागार, ग्रंथालय, परीक्षा भवन यासह मुलींचे वस्तीगृह पूर्ण झाले असून मुलांचे वस्तीगृह अंतिम टप्प्यात आहे. ६०० बेड्सचे सामान्य रुग्णालय, २५० बेड्सचे कॅन्सर रुग्णालय आणि २५० बेड्सचे सुपर स्पेशलिटी रुग्णालय मार्च २०२७ अखेर पूर्ण होतील.

सी.पी.आर. ची ऐतिहासिक मुख्य बिल्डिंग हेरिटेज म्हणून जतन करण्यात आली असून मूळ सौंदर्य राखून नूतनीकरण केले असल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी कंत्राटदाराचे कौतुक केले.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, तसेच विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांनी शेंडा पार्कसह संबंधित सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांची कामगिरी प्रगतीपथावर असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

Total Visitor Counter

3252149
Share This Article