कडवई/मिलिंद चव्हाण: सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधले जात असून, ग्राहकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये यासाठी बँक ऑफ इंडियाच्या कडवई शाखेत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील शाखेचे शाखा प्रबंधक सुदाम पाटमास यांनी ग्राहकांची बैठक घेऊन त्यांना सायबर गुन्हेगारी आणि विशेषतः ‘डिजिटल अटक’ यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारांपासून दक्ष राहण्याचे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सुदाम पाटमास यांनी सांगितले की, सध्या ‘डिजिटल अटक’ हा नवीन प्रकारचा घोटाळा मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. यामध्ये फसवणूक करणारे स्वतःला पोलीस, सीबीआय किंवा न्यायालयीन अधिकारी असल्याचे भासवतात आणि एखाद्या गुन्ह्यात अडकल्याची भीती दाखवून ‘डिजिटल अटक’ केल्याची खोटी ओळख निर्माण करतात. पीडितांना व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते. मात्र, अशा कोणत्याही प्रकारची अटक कायद्यात अस्तित्वात नाही, असे स्पष्ट करत त्यांनी ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत अशा कॉलला घाबरून न जाता कॉल त्वरित डिस्कनेक्ट करण्याची सूचना केली. तसेच अशा प्रसंगी तातडीने कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोणतीही कायदेशीर अंमलबजावणी संस्था फोन, व्हॉट्सॲप किंवा व्हिडिओ कॉलवर कधीही पैशांची मागणी करत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. आपली वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका आणि संशयास्पद वाटल्यास नजीकच्या बँकेत जाऊन खात्री करून घ्या, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
या मार्गदर्शन कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी धीरज मेश्राम, कॅशियर प्रतीक गजभिये, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, येडगे सेवाकेंद्राच्या संचालिका कुंदा येडगे, शाखा समन्वयक अरविंद जाधव, शाखा सहायक महेश होडे, योगेश पंडित, अनंत येलोंडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने बँक ग्राहक उपस्थित होते.






