GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत आंबा बागेत आग लावून नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
178 Views

रत्नागिरी : तालुक्यातील चिंचखरी येथे आंबा बागेतील झाडाखाली आग लावून पिकाचे नुकसान केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बाबुराव सुर्वे (वय ६३, रा. चिंचखरी) यांनी यासंदर्भात तक्रार दिली असून, आत्माराम बाळाराम बोरकर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, संजिवनी सदानंद बोरकर यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक ४१/६८ मधील आंब्याची झाडे फिर्यादी संतोष सुर्वे यांनी आंबे काढण्याच्या कराराने घेतली आहेत. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास सुर्वे हे बागेत माकडे आली आहेत का, हे पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी आत्माराम बोरकर याने बागेतील पालापाचोळा एकत्र न करता थेट झाडाखालीच पेटवून दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत सुर्वे यांनी विचारणा केली असता, आरोपीने त्यांना घाणेरडी शिवीगाळ करत दमदाटी केली. सुर्वे यांनी ही झाडे कराराने घेतल्याचा राग मनात धरून आरोपीने मुद्दाम झाडाखाली आग पेटवून तयार झालेल्या आंब्यांचे नुकसान केले. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(फ), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3391816
Share This Article