GRAMIN SEARCH BANNER

ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली रत्नागिरीतील वृद्धाची ३.९२ लाखांची फसवणूक

Gramin Varta
233 Views

रत्नागिरी : शहरालगतच्या उद्यमनगरमधील पडवेकर कॉलनी येथे राहणाऱ्या ७७ वर्षीय वृद्धाची ऑनलाईन खरेदी करताना सायबर भामट्यांनी तब्बल ३ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २१ आणि २२ डिसेंबर २०२५ रोजी घडली.

मदन नारायण भास्करे (वय ७७, रा. पडवेकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारीनुसार, भास्करे यांनी २१ डिसेंबर रोजी एका ऑनलाईन अ‍ॅपद्वारे तीन वस्तूंची खरेदी केली होती. मात्र, काही दिवसांत केवळ एकच वस्तू मिळाल्याने उर्वरित दोन वस्तूंविषयी माहिती घेण्यासाठी त्यांनी गुगलवर शोध घेऊन कस्टमर केअरचा क्रमांक मिळवला. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने रिफंड प्रक्रियेसाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

विश्वास ठेवून भास्करे यांनी संबंधित अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर काढण्यात आली. त्यांच्या सर्व्हिस खात्यातून १ लाख ९६ हजार रुपये आणि पेन्शन खात्यातून आणखी १ लाख ९६ हजार रुपये, अशी एकूण ३ लाख ९२ हजार रुपयांची रक्कम भामट्यांनी लंपास केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भास्करे यांनी तत्काळ रत्नागिरी शहर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366906
Share This Article