रत्नागिरी: जयगड येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाची चमक दाखवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, अनेक विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा स्पर्धेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कु. इब्राहिम मजहर टेमकर याने धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक, तर उंच उडी या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला आहे. सांघिक खेळातही शाळेने आपली छाप पाडली असून, संदखोल केंद्राचे नेतृत्व करताना शाळेतील कबड्डी लहान गट (मुली) संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. या कामगिरीच्या जोरावर शरीफा समीर मुजावर व आरफा मुजीब संसारे (इयत्ता पाचवी) या दोन्ही विद्यार्थिनींची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच मोठ्या गटातील थाळीफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारात खतिजा परवेज होडेकर हिने प्रभागस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत तालुकास्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे.
विशेष म्हणजे क्रिकेटमध्येही शाळेच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. तालुका स्तरावर होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी शाळेच्या पाच मुलांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कु. ईसमाईल नाझीश संसारे, कु. युसुफ तोसिफ पांजरी, कु. जकवान फाहीक गडबडे, कु. सदीम सफदर संसारे आणि आनसर आसलम वाडकर यांचा समावेश आहे. या निवडीमुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शाळेच्या या यशाबद्दल गणपतीपुळे बीट विस्तार अधिकारी श्रीम. सविता तोटावर, संदखोल केंद्रप्रमुख अरविंद महाकाल, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चामे, तसेच शिक्षिका आस्मा मॅडम, आरजू मॅडम, सना मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परवेज टेमकर, उपाध्यक्ष तौसिफ पांजरी आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






