देवरुख:शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेमुळे विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा आणि त्यांच्या शारीरिक वाढीस पोषक वातावरण तयार व्हावे, हा उद्देश आहे. परंतु संगमेश्वर तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपासून या योजनेचा पुरवठा बंद असल्याने शाळांमध्ये पोषण आहार शिजवण्याचे काम ठप्प झाले आहे. फेब्रुवारीपासून एकाही शाळेला पोषण आहारासाठी लागणारे साहित्य मिळालेले नाही.
तालुक्यात 333 जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार शिजवला जातो. यासाठी तांदूळ, डाळी, कडधान्ये, तेल यांसारख्या वस्तू शासन पुरवते आणि शाळांमध्ये महिलांची नेमणूकही केली जाते. पूर्वी मिळालेल्या साहित्याचा साठा (बफर स्टॉक) संपल्यानंतर आता मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना ‘आता काय?’ असा प्रश्न भेडसावत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत आकर्षित करण्यासाठी शासनाने मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि पोषण आहार योजना लागू केली आहे. परंतु त्याच योजनेंतर्गत आवश्यक साहित्य पाच महिन्यांपासून न मिळणे, ही दुर्दैवी बाब मानली जात आहे.
या गंभीर प्रश्नाकडे अद्याप कोणत्याही राजकीय नेत्याने, लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष दिलेले नाही. अधिकारी वर्गही गप्प आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता समजले की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना एकच पुरवठादार आहे, आणि सध्या दोन्ही ठिकाणी आहार साहित्याचा तुटवडा जाणवतो आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
संगमेश्वर तालुक्यात 5 महिन्यांपासून शालेय पोषण आहार ठप्प;पुरवठा बंद, पालकांतून नाराजी
