संगमेश्वर/ सिकंदर फरास: संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावामध्ये बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या संचारामुळे नागरिकांमध्ये सध्या कमालीची भीती पसरली आहे. बिबट्या गावाच्या वस्तीजवळ, घरांच्या परिसरात तसेच रस्त्यांवर आणि जनावरे बांधलेल्या ठिकाणी फिरत असल्याच्या चर्चांमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. जंगलात बिबट्याची दहशत वाढल्यामुळे गुरे चारण्यासाठी वनक्षेत्रात जाणाऱ्या गुराख्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, दाभोळे बाजारपेठेतील ग्रामस्थ श्री. जाफर अब्बास थोडगे यांच्या पत्नी यांनी पहाटेच्या वेळी आपल्या घराच्या अगदी जवळ बिबट्याला पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. ही माहिती गावात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले.
गावात बिबट्याच्या संचारामुळे निर्माण झालेली ही गंभीर परिस्थिती लक्षात घेताच, दाभोळे गावाचे विद्यमान सरपंच श्री. राजेश शांताराम रेवाळे यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. त्यांनी जराही वेळ न घालवता तातडीने वनविभाग कार्यालयाला यासंबंधी माहिती देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
सरपंचांनी माहिती दिल्यानंतर वनविभागही सतर्क झाले आहे. वनविभाग अधिकारी श्रीमती. सुप्रिया काळे यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, वन्य प्राणी आणि मनुष्य यांच्यात कोणताही संघर्ष होऊ नये यासाठी वनविभाग पूर्णपणे दक्षता घेत असल्याचेही श्रीमती. काळे यांनी स्पष्ट केले आहे. बिबट्याच्या या वाढत्या संचारामुळे दाभोळे गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थ सुरक्षिततेसाठी वनविभागाच्या पुढील कार्यवाहीकडे डोळे लावून बसले आहेत.