GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमधील पत्रकारावर हल्ल्याचा संगमेश्वर पत्रकार संघाकडून तीव्र निषेध

Gramin Varta
155 Views

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन; हल्लेखोरांवर तात्काळ कडक कारवाईची मागणी

संगमेश्वर/ मुजीब खान: चिपळूण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे २५ मार्च रोजी एका पत्रकारावर झालेल्या भीषण हल्ल्याच्या घटनेने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा हल्ला अत्यंत गंभीर असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुका पत्रकार संघाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत तत्काळ पावले उचलली. संघाच्या वतीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. निलेश माईनकर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात हल्लेखोरांवर कठोर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी, न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके स्थापन करण्याची तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, असा आग्रहही यावेळी धरण्यात आला.
या वेळी संघाचे अध्यक्ष मुजीब खान, उपाध्यक्ष वहाब दळवी, पत्रकार धनाजी भांगे, सचिन पाटोळे, नियाज खान, दीपक तुळसणकर तसेच पत्रकार डिके साहेब उपस्थित होते. अध्यक्ष मुजीब खान म्हणाले, “पत्रकारांवर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला होय. प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” उपाध्यक्ष वहाब दळवी यांनीही अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व पत्रकारांनी एकजूट दाखवून आपल्या सुरक्षेसाठी सजग राहावे, असे आवाहन संघाकडून करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार संघाकडून देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3391871
Share This Article