GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी तक्रारीनंतर दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल

दापोली: तालुक्यातील वणौशी तर्फे नातू देवूळवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना ३ एप्रिल रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या गटातील फिर्यादी राजकुमार बाळाजी पाटणे (वय ६२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या पत्नीसह जात असताना अंकुश दत्ताराम पाटणे यांनी घराच्या बांधकामाला विरोध केल्याच्या रागातून त्यांना शिवीगाळ करत अंगावर दगड मारून दुखापत केली. तसेच दिनेश पाटणे यांनी छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली आणि इतर महिला आरोपींनी त्यांना जीवंत न ठेवण्याची धमकी देत अपमानित केले. या तक्रारीवरून पोलिसांनी अंकुश, दिनेश, सुनंदा आणि सुप्रिया पाटणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, याच घटनेप्रकरणी अंकुश दत्ताराम चव्हाण (पाटणे) (वय ५०, सध्या रा. विरार) यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीनुसार ते आपल्या नवीन घराच्या बांधकामाच्या मुहूर्ताची पूजा करत असताना राजकुमार पाटणे आणि ज्योत्स्ना पाटणे यांनी तिथे येऊन “ही आमची जागा आहे, इथे घर बांधायचे नाही” असे म्हणत वाद घातला. यावेळी राजकुमार पाटणे यांनी हातातील दगडाने अंकुश यांच्या उजव्या हाताच्या पंजावर मारून दुखापत केली, तर मदतीला धावून आलेला भाऊ दिनेश याच्या पाठीत जोत्स्ना पाटणे यांनी दगड मारला. तसेच त्यांच्या वृद्ध आईला ढकलाढकल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या परस्परविरोधी तक्रारींनंतर दापोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले असून, कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून झालेल्या या राड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3486889
Share This Article