चिपळूण: चिपळूण शहरात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुराच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने सतर्कतेची भूमिका घेत, आगाराचे कामकाज शिवाजीनगर बसस्थानकात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार महिन्यांच्या पावसाळी कालावधीत चिपळूण एसटी आगारातील अधिकारी व कर्मचारी आपले सर्व कामकाज शिवाजीनगर येथून पार पाडणार असून, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या नियमित फेऱ्या पूर्वीप्रमाणेच मध्यवर्ती बसस्थानकातूनच सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चिपळूण शहरात दरवर्षी पुराचे पाणी सर्वप्रथम मध्यवर्ती बसस्थानकात शिरते. २०२१ मधील महापुराचा अनुभव लक्षात घेता, यंदा आगाऊ तयारीचा भाग म्हणून एसटी प्रशासनाने महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य आणि कार्यालयीन कामकाज धोकादायक भागातून सुरक्षित स्थळी हलवले आहे. मागील पुरात दोन ते अडीच फूट पाणी बसस्थानकात साचल्याने एसटीच्या सेवा ठप्प होण्याची वेळ आली होती आणि आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर बसस्थानक ही सुरक्षित जागा म्हणून निवडण्यात आली आहे.
शिवाजीनगर बसस्थानकावर पूर्वीही अनेक बस थांबत होत्या, विशेषतः मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांसाठी हा मार्ग उपयुक्त होता. यंदा पावसाळ्यात चिपळूण एसटीच्या सर्व फेऱ्या शिवाजीनगर येथून सुटून, मध्यवर्ती बसस्थानकावर जाऊन ठरलेल्या मार्गावर पुढे जातील. मध्यवर्ती बसस्थानकाचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले असून, तेथे सुमारे १५० ते २०० बसेस सामावू शकतील इतकी मोठी जागा उपलब्ध आहे.
या बदलाबाबत माहिती देताना चिपळूण आगारप्रमुख दीपक चव्हाण म्हणाले, “महापुराचा धोका लक्षात घेता शिवाजीनगर येथून कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्व काळजी घेतली जाईल. पावसाळ्यातील चार महिने नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती आहे.”
एसटी प्रशासनाचा हा निर्णय केवळ आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नव्हे, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि कार्यक्षमतेचा विचार करून घेतलेला असून, यामुळे संभाव्य नुकसानीपासून बचाव होणार आहे.