गुगल मॅपवर शॉर्टकट शोधला मात्र घाटात अडकला
रत्नागिरी: उक्षी-करबुडे घाटात 8.30 वाजता एक टँकर अडकल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी Google Maps वर शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात हा टँकर चालक घाटात आला आणि टँकर अरुंद रस्त्यावर अडकला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या अनेक वाहनांची रांग लागली आहे.
स्थानिक लोकांच्या मदतीने टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र घाटातील अरुंद आणि अवघड वळणांमुळे हे काम अधिकच आव्हानात्मक झाले आहे. टँकर अडकल्याने छोटे-मोठे चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक अडकून पडले आहेत. अनेक वाहनचालकांना परतीचा मार्ग अवलंबून पुन्हा महामार्गाकडे जावे लागत आहे.
या घाटात अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे आणि याबाबत अनेक ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. तरीही अनेक वाहनचालक Google Maps च्या मदतीने शॉर्टकट शोधण्याच्या नादात या घाटात येतात. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक प्रशासनाने यावर अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, वेळेचाही अपव्यय होत आहे. Google Maps सारख्या ॲप्सवर पूर्णपणे अवलंबून न राहता वाहनचालकांनी स्थानिक मार्गांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. टँकर काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.