GRAMIN SEARCH BANNER

ग्रामीण भागात वाढतेय उपवर नवरदेवांचे प्रमाण; नोकरदार जावयाच्या अपेक्षेमुळे लग्नांना लागलाय ‘ब्रेक’

Gramin Varta
207 Views

रत्नागिरी/ सचिन यादव : कर्तव्य आहे असे म्हणत दिवाळी गेली, आता उन्हाळा सुरू झाला पण लग्नांचे वारे मात्र वाहत नाहीत अशी परिस्थिती सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. कोविड काळानंतर तीन वर्षे उलटून गेली, तरीही अनेक तरुणांचे विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत. कारण एकच मुलींकडून नोकरदार जावयाची अट! कोविडमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काही तरुणांनी शिक्षणानंतर व्यवसाय सुरू केला, तर काही शेतीकडे वळले. मात्र मुलगी पाहणीवेळी सरकारी नोकरी आहे का, पगार किती, जमीन किती, मुलगा निर्व्यसनी आहे का असे प्रश्न विचारले जात असल्याने विवाह जुळविण्यात मोठी अडचण येत आहे. परिणामी, उपवर तरुणांचे वय वाढत चालले असून काही जण व्यसनाधीनतेकडे वा मानसिक तणावाकडे वळत आहेत. अनेक समाजांमध्ये मुलींचे प्रमाण कमी होत असताना, त्यांच्या विवाहाच्या अपेक्षा मात्र वाढत चालल्या आहेत. नवरा नोकरदार, आईवडिलांना एकुलता एक, शहरात राहणारा या गोष्टींना प्राधान्य दिले जात असल्याने ग्रामीण भागातील शिक्षित, पण बेरोजगार किंवा खाजगी नोकरी करणाऱ्या तरुणांचे लग्न ठरत नाही.

काही पालक तर लग्नाचा संपूर्ण खर्च करण्यास तयार असले तरी, मुलींकडील मंडळी लग्नास सहमती दर्शवत नाहीत. मुलगी समजूतदार, घर सांभाळणारी आणि साध्या कुटुंबातील असावी अशी अपेक्षा ठेवणारे अनेक तरुण मात्र उपवर राहतात. परिणामी ग्रामीण भागात उपवर नवरदेवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समाजात शेती, व्यवसाय, खाजगी नोकरी करणारे अनेक तरुण सक्षम आहेत. प्रत्येक मुलीने फक्त नोकरदार नवऱ्याचीच अपेक्षा ठेवू नये मानसिकता बदलणे काळाची गरज आहे असे नागरिक रघुनाथ आमकर यांचे मत आहे. संयोग बेटकर म्हणतात, शिक्षित, घर सांभाळणारी, आईवडिलांना जपणारी आणि कठीण प्रसंगात साथ देणारी समंजस अर्धांगिनी मला हवी आहे. तर राकेश लाड यांचे मत वेगळे फेमिनिस्ट नको, पण विचार चांगले हवेत. फॅमिली व्हॅल्यूज कळाव्यात. आधुनिकतेसोबत संस्कारांचा योग्य संगम असावा. नोकरी करणारी चालेल, पण परंपरा विसरू नये. ग्रामीण भागात वाढत्या उपवर तरुणांचे प्रमाण पाहता, विवाह संस्थेतील नोकरदार नवऱ्याची अट ही सामाजिक चिंतनाची बाब बनली आहे. समाजाने दृष्टिकोन बदलल्यास अनेक तरुणांच्या आयुष्यात आनंदाचा सोहळा पुन्हा उजळू शकतो.

Total Visitor Counter

3214063
Share This Article