GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुक्यातील कोरेगाव-संगलट रस्त्याची दुरवस्था; जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष!

Gramin Varta
233 Views

खेड: खेड तालुक्यातील महसूल मिळवून देणारा आणि अनेक गावांसाठी महत्त्वाचा दुवा असलेला कोरेगाव-संगलट रस्ता सध्या दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, प्रवाशांना अक्षरशः आपला जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही ते लक्ष देत नाहीत, उलट ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक लोकांच्या कमरेचे मणके सडल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, या भागातील लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अनेक मंत्र्यांनी याच रस्त्यावरून प्रवास केला आहे, परंतु त्यांच्या ‘हाय-फाय’ गाड्यांमुळे त्यांना रस्त्याची बिकट अवस्था जाणवली नसावी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

हा रस्ता खेडसह दापोली, मंडणगड, आणि गुहागर अशा तीन तालुक्यांना जोडणारा आहे. रस्त्याची स्थिती इतकी वाईट आहे की, ‘या रस्त्यावर डांबरी रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशी उपहासात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. एक-एक फुटापेक्षा अधिक खोल खड्डे पडल्याने अनेक वेळा दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. या अपघातांना जबाबदार कोण? असा थेट प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.

काही महिन्यांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. मतदानासाठी दारोदार फिरणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता यावेळी चांगलीच धडा शिकवेल, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दापोली तालुक्यात मंत्री योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून रस्ते चकाचक होताना दिसतात, मग गुहागर विधानसभा मतदारसंघातील हा रस्ताच का दुर्लक्षित ठेवला जातोय, यामागे काय कारण आहे, अशी विचारणा होत आहे.

कोरेगाव-संगलट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चोरट्या वाळू आणि चिऱ्याची वाहतूक करणारे चार-चार ब्रासचे जड ट्रक धावत असल्याने रस्त्याची दुरवस्था आणखी वाढली आहे. या वाहनांमुळे खड्ड्यांमध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे टायर जाऊन अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून आता प्रवास करावा की नाही, असा विचार करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. जर सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने झाली नाही, तर आगामी निवडणुकीत मतपेटीतून लोकांचा राग दिसून येईल, यात शंका नाही.

Total Visitor Counter

3373407
Share This Article