संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. नाझिमा रमजान गोलंदाज (बांगी) यांच्या प्रभावी कार्याची दखल घेत, शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुचरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांना जिल्हा पातळीवर संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
सौ. नाझिमा गोलंदाज (बांगी) या गेल्या १० वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर सदस्य, उपसरपंच आणि सरपंच अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. प्रशासन आणि जनतेमध्ये योग्य समन्वय साधत त्यांनी ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक उपक्रमांत आपली छाप सोडली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने सक्रिय असतात.
पक्षनिष्ठ आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांची संगमेश्वर तालुक्यात ओळख आहे. गेल्या १० वर्षांपासून त्या शिवसेना पक्षाच्या महिला शाखा प्रमुख म्हणून पक्षसंघटन मजबूत करण्याचे कार्य करत आहेत. याचबरोबर, सौ. गोलंदाज (बांगी) या ‘नवनिर्मिती फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले असून, त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि शिक्षण व आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे.
स्थानिक पातळीवर मोठा जनाधार असलेल्या आणि कार्यतत्पर असणाऱ्या सौ. गोलंदाज यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिल्यास पक्षाला फायदा होईल, अशी खात्री कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षश्रेष्ठींनी मुचरी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या नावाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी एकमुखी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.






