रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिस परेड मैदानावर खो-खो खेळासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेती श्रेया सनगरे हिला राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. मात्र हा चेक तिच्याकडून नकळत गहाळ झाला.
दरम्यान, हा चेक रत्नागिरीतील वैभव जाधव यांना मिळाला. त्यांनी कोणताही विलंब न लावता तो रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा आणून दिला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस दलाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.तसेच हा चेक श्रेया सनगरे हिच्याकडे सुपूर्द करण्याची कार्यवाही पोलीस दलाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
वैभव जाधव यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून सर्वत्र त्यांच्या या आदर्श कृतीचे कौतुक होत आहे.
स्वातंत्र्यदिनी क्रीडा विजेतीचा 10 हजारांचा चेक हरवला; वैभव जाधव यांनी केला परत!
