GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालयाचे ‘शब्दांकुर’ हस्तलिखित प्रकाशित

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी: येथील जनसेवा ग्रंथालयातर्फे दीपोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या ‘शब्दांकुर’ हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.भारतीय संस्कृतीत हस्तलेखनाची परंपरा खूप प्राचीन आहे.

आज टॅब, कॉम्पुटर ते अगदी व्हाइस टायपिंग आले. या साधनांमुळे हस्तलेखन मागे पडते की काय, अशी परिस्थिती शाळा-महाविद्यालयातूनही निर्माण झाली आहे. अशा वेळी हस्तलेखनाची प्राचीन परंपरा जोपासावी, ती जोपासताना नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने जनसेवा ग्रंथालयातर्फे गेली २५ वर्षे ‘शब्दांकुर’ हे हस्तलिखित प्रसिद्ध केले जाते. दीपोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

जनसेवा ग्रंथालयात झालेल्या कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते शब्दांकुरचे प्रकाशन झाले. आजपर्यंत २५ हस्तलिखिते जनसेवा ग्रंथालयाने दीपोत्सवानिमित्त काढली. यानिमित्ताने रत्नागिरीतील अनेक नवोदित लेखकांना, वाचकांना लिहिते करण्याचा प्रयत्न शब्दांकुरच्या संपादक मंडळाने केला. कथा विशेषांक, बोलीभाषा विशेषांक, जन्मशताब्दी विशेषांक असे विशेषांकही काढले. हस्तलिखित काढताना सारे काही स्वहस्ते करायचे, त्यामुळे लिहिणे-चित्रे रंगविणे यांपासून सारी कामे हातानेच करण्यात येतात. यासाठी गणेशोत्सवाआधी शब्दांकुरचे लेखन सुरू करावे लागते. यावर्षीच्या शब्दांकुरचे संपादन अमोल पालये यांनी केले आहे.

ग्रंथालयाच्या कर्मचारी सुजाता कोळंबेकर गेली २५ वर्षे या हस्तलिखिताचे एकटाकी लेखन करत आहेत. यावर्षीचाही शब्दांकुर त्यांनी अतिशय सुबकपणे लिहून काढला आहे. जनसेवा हा एक वटवृक्ष आहे, असे कल्पून त्यावर वाचकांच्या प्रतिभेची शब्दाक्षरे उमलली आहे, असे दर्शविणारे सुरेख मुखपृष्ठ यंदाच्या शब्दांकुरसाठी सौ. छाया माईण-पालये यांनी साकारले आहे. आविष्कार शाळेतील विशेष मुलांनी यावर्षीच्या शब्दांकुरमध्ये रंगचित्रे काढली आहेत.

प्रकाशन कार्यक्रमाला जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, संपादक अमोल पालये, कार्याध्यक्ष राहुल कुलकर्णी, जनसेवा ग्रंथालयाचे कार्यकारी सदस्य, ग्रंथपाल अनुजा पटवर्धन, वाचक, लेखक, सभासद उपस्थित होते.

Total Visitor Counter

2678327
Share This Article