GRAMIN SEARCH BANNER

पैशांच्या बाजारात सामान्य माणूस निवडणूक कशी लढणार? विकासाचे मुद्दे दुय्यम;पैशाला महत्व

Gramin Varta
13 Views

सुहास खंडागळे यांचा सवाल; गाव विकास समितीची जिल्हा परिषद निवडणुका लढणार नसल्याचे संकेत

रत्नागिरी :- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, ‘गाव विकास समिती’चे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी सध्याच्या निवडणूक पद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. निवडणुकीत होणारा पैशांचा अवाढव्य वापर पाहता, सामान्यांनी ही निवडणूक का लढावी, असा सवाल उपस्थित करत त्यांनी एकप्रकारे गाव विकास समिती निवडणुकीतून माघार घेण्याचे किंवा वेगळ्या भूमिकेचे संकेत दिले आहेत.

‘निवडणूक नव्हे, हा तर खरेदी-विक्री संघ’

सुहास खंडागळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “निवडणुकीत राजकीय पक्षाचे बलाढ्य आणि धनाढ्य उमेदवार पैसे वाटून निवडणुका जिंकतात आणि लोकही पैसे घेऊन त्यांना मदत करतात. जेव्हा विकास हा मुद्दाच उरत नाही, तेव्हा सामान्य माणसाने निवडणुकीच्या रिंगणात कशासाठी उतरायचे?”
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, जिथे पैशांच्या जोरावर मतदान होते, त्याला ‘निवडणूक’ न म्हणता ‘खरेदी-विक्री संघ’ म्हणणे अधिक योग्य ठरेल.

गाव विकास समितीची भूमिका काय?
खंडागळे यांच्या या भूमिकेमुळे गाव विकास समिती आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक लढणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सध्याच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर न होता पैशांच्या जोरावर लढल्या जात आहेत. जोपर्यंत मतदार पैसे घेऊन मतदान करणे थांबवत नाहीत, तोपर्यंत नवीन संकल्पना असलेले लोक राजकारणात येऊ शकणार नाहीत.धनाढ्य उमेदवारांमुळे प्रामाणिक आणि काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढणे अशक्य झाले आहे.

सुहास खंडागळे यांनी केवळ व्यवस्थेवर टीका न करता, मतदारांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले आहे. “जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या लोकांसाठी राजकारणाचे दरवाजे बंदच राहतील,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गाव विकास समिती आता निवडणुकीत प्रत्यक्ष उतरून या व्यवस्थेला आव्हान देणार की निवडणूक न लढता केवळ प्रबोधनावर भर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3199305
Share This Article