पाटणचा ब्रिटीशकालीन दीडशे वर्षांपूर्वींचा धांडे पूल जमीनदोस्त; पाटण शहरातून वाहतूक बंद झाल्याने पर्यायी मार्ग अनिवार्य

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

कराड : पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला पाटण शहरातील दीडशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक ब्रिटीशकालीन धांडे पूल  बुधवारी सकाळी नऊ वागण्याच्या सुमारास प्रशासनासह पोलिसांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.

यावेळी स्थानिक लोकांनी गर्दी केली. धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पाटण शहरातून ६० दिवस वाहतूक बंद राहणार असून, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अनिवार्य राहणार आहेत.

कराड ते चिपळूण मार्गावरील पाटण शहरातील केरा पूल ते रामापूर दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. पाटण शहरातील धांडे पुलाची रुंदी, उंची वाढविणेही अत्यावश्यक झाल्याने हा दीडशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक धांडे पूल नियोजनानुसार आज बुधवारी सकाळी पाडण्यात आला.

प्रशासनाच्या देखरेखीखाली अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पूल पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक वर्षांपासून वाहतुकीचा भार सहन करणारा हा पूल जीर्णावस्थेत गेला होता. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्‍वभूमीवर तो अपुराही ठरत असल्याने तिथे नवीन, मजबूत व सुरक्षित पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धांडे पूल पाडण्याच्या घटनेने पाटणकरांचे लक्ष वेधले.

स्थानिकांनी गर्दी करत ते या ऐतिहासिक पुलाच्या अखेरच्या क्षणांचे साक्षीदार झाले. काहींनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुलाशी असलेले आपले भावनिक नातेही व्यक्त केले. पूल पाडल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहनधारकांना केले आहे.

पाटण शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६- ई यावरील धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसह पाटण शहरातील केरा पूल ते रामापूर दरम्यान, बाजारपेठेतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी अखेर वाहतूक दोन महिन्यांसाठी बंदी करण्यात आली आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्थेनुसार कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक कराड- पाचवड फाटा- कोकरूड- मलकापूर- आंबा घाट- संगमेश्वरमार्गे चिपळूणकडे वळविण्यात आली.

चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूक चिपळूण- संगमेश्वर- आंबा घाट- कोकरूड- मलकापूर- कराड व उंब्रज या मार्गाने वाहतूक सुरू राहील. कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी हलकी वाहतूक कराड- नेरळे- गहिवरवाडी फाटा- नवारस्तामार्गे चिपळूण महामार्गाला जोडण्यात आली आहे. चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी हलकी वाहतूक चिपळूण- नेरळेगोंड- गव्हाणवाडी फाटा- नवारस्तामार्गे कराड व उंब्रजकडे वळविण्यात आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *