रायगड जिल्ह्यात पाचव्या किल्ल्याचा थरारक शोध; रोहा तालुक्यात ‘अज्ञात गडाचे’ अवशेष उघड

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रोहा: तालुक्यातील वाळंजवाडी परिसरात वर्षानुवर्षे साधा डोंगर समजला जाणारा भाग प्रत्यक्षात ऐतिहासिक किल्ल्याचे अवशेष असल्याचे समोर आल्याने इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता आणि खळबळ निर्माण झाली आहे.आतापर्यंत अवचितगड, घोसाळगड, सुरगड आणि बिरवाडी (भवानी) गड अशी चार किल्ल्यांची ओळख असलेल्या रोह्यात आता पाचव्या किल्ल्याची भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत, कोलाडपासून काही अंतरावर असलेल्या या डोंगरावर ‘रायगड दूर गाईड’च्या सदस्यांनी गुप्त शोधमोहीम राबवली. सुरुवातीला केवळ संशयावरून पाहणी सुरू करण्यात आली होती. मात्र पुढील तपासणीदरम्यान डोंगरावर कोरलेली पाण्याची टाकी, तटबंदीचे अवशेष, खाचा तसेच मातीखाली दडलेले बांधकामांचे पुरावे आढळून आले. या सर्व बाबींच्या आधारे हा भाग साधा डोंगर नसून ऐतिहासिक गड असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या ठिकाणी सातत्याने शोधकार्य सुरू होते. विविध मोहिमांमधून साफसफाई आणि प्राथमिक उत्खनन करण्यात आले. त्यातून समोर आलेल्या पुराव्यांमुळे या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या भागात पूर्वी ‘गड’ असल्याच्या कथा प्रचलित होत्या; मात्र त्याला ठोस पुरावा नव्हता. आता मात्र त्या कथांना ऐतिहासिक अधिष्ठान मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.या शोधानंतर रोहा तालुक्यात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. संबंधित ठिकाणाचे संरक्षण, अधिकृत सर्वेक्षण आणि पुरातत्व विभागामार्फत सखोल तपासणी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.जर या गडाची अधिकृत नोंद झाली, तर रोह्याच्या इतिहासात नव्या सुवर्णपानाची नोंद होईल, यात शंका नाही.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *