GRAMIN SEARCH BANNER

नांदिवडे येथे रिसॉर्ट चालविण्याच्या बहाण्याने ६८ वर्षीय महिलेची आर्थिक फसवणूक; पुणे येथील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Gramin Varta
168 Views

जयगड: रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे येथे रिसॉर्ट चालविण्यास घेऊन मालकाचा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील एका वृद्ध दाम्पत्यावर जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सौ. मोहना मनमोहन जोग (वय ६८, रा. नांदिवडे) यांनी फिर्याद दिली असून, आरोपींनी केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही, तर फिर्यादी महिलेशी अश्लील वर्तन करून त्यांच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदिवडे येथील फिर्यादी यांचे रिसॉर्ट आरोपी मुकुंद माधव चाफेकर (वय ७०) आणि आरती मुकुंद चाफेकर (वय ६५, दोन्ही रा. बाणेर, पुणे) यांना तोंडी करारावर चालविण्यास दिले होते. या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांचा पती आणि मुलगा यांना विविध प्रलोभने दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर रिसॉर्ट चालविणे, नारळाचे उत्पन्न घेणे आणि बंगल्याचा वरील मजला वापरण्याची परवानगी मिळवून फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली. तसेच २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी फिर्यादी आपल्या अंगणात उभ्या असताना आरोपी मुकुंद चाफेकर याने त्यांना उद्देशून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी २१ जानेवारी २०२६ रोजी जयगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ७९ आणि ३(५) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3379667
Share This Article