प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
नागपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज आकारास आले आहे.
येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे. आपण इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे गती मिळाली. या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल तसेच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सदर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी समाजातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून याला पुरेसा निधी उपलब्ध केला आहे. आज ओबीसी मुलासाठी 60 पेक्षा जास्त वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. महाज्योतीतून प्रशिक्षण घेऊन मुले विविध स्पर्धा परिक्षेत यश संपादन करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलिअर मर्यादा आपण आठ लाखांपर्यंत नेली आहे. ओबीसी समाजाच्या कल्याणसाठी शासन तत्पर असल्याचे ते म्हणाले.
शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाज्योती संस्थेच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणी आज झाली आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. नागपूरच्या भूमीवर आता ‘महाज्योती’ची भव्य 7 मजली प्रशासकीय इमारत तयार होणार आहे. हा केवळ वास्तूचा नव्हे तर शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारा क्षण असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
ही प्रशासकीय इमारत शिक्षणासह संस्कार आणि संशोधनासाठी आदर्श मापदंड ठरेल – मंत्री अतुल सावे
नागपूर येथील महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीत वाचनालय, समुपदेशन कक्ष, प्रशिक्षण कक्ष, भोजन कक्ष आणि 248 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय अशा सर्व सुविधांचा समावेश असणार आहे. ही वास्तू म्हणजे शिक्षण, संस्कार आणि संशोधनाचा पवित्र संगम राहणार आहे. नाशिक येथे देखील महाज्योती संस्थेचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 174 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. सावे यावेळी म्हणाले.
महाज्योती संस्थेतून प्रशिक्षण घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार व महाज्योतीच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आला. तसेच सात मजली प्रशासकीय इमारत बांधकामाची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी केले. आभार मुख्य लेखा अधिकारी प्रशांत वावगे यांनी मानले. तर सूत्रसंचालन दिनेश मासोडकर यांनी केले.
अशी असेल सात मजली प्रशासकीय इमारत
राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी उभारली जाणाऱ्या भव्य 7 माळ्याची प्रशासकीय इमारतीचे बांधकाम नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) मार्फत होत आहे. महाज्योतीच्या कार्यक्षमतेत आणि सेवाक्षमतेत अभूतपूर्व वाढ घडवणारा हा पायाभूत उपक्रम ठरणार आहे. या प्रशासकीय इमारतीत तळघर क्रमांक 1 व 2 मध्ये मुबलक वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तळमजल्यावर 500 लोकांच्या क्षमतेचे ऑडिटोरियम, अभ्यास कक्ष, नियंत्रण कक्ष आणि उपहारगृह असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यांवर अधिकारी व कर्मचारी यांची बैठक व्यवस्था तसेच प्रशासकीय सभागृह असतील. तिसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष व उपहारगृह, तर 4, 5, 6 आणि 7 व्या मजल्यांवर प्रशिक्षण कक्ष आणि बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. ही इमारत आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक बांधणी आणि कार्यक्षम जागा नियोजनाचा सुंदर संगम ठरणार आहे.