गुहागर : येथे पर्यटनसाठी आलेल्या पुण्यातील एका ६० वर्षीय पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश नायर असे मृत व्यक्तीचे नाव असून, गुहागर येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील रहिवासी असलेले सुरेश नारायणन नायर (वय ६०) हे काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत गुहागर येथे पर्यटनासाठी आले होते. ते गुहागरमधील वरचापाट येथील ‘ओसरी हॉटेल’मध्ये थांबले होते. १५ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास नायर त्यांच्या खोलीत बेडवर झोपले असताना त्यांच्यात कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
नायर यांची मुलगी निकिता नायर यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ प्रो लाईफ हॉस्पिटल, शृंगारतळी येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून नायर यांना पहाटे ५ वाजता मृत घोषित केले. या घटनेमुळे नायर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गुहागरमध्ये पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू
