रत्नागिरी: ग्राहक पंचायत (महाराष्ट्र) या संस्थेचा उत्कृष्ट शेतकरी राज्य पुरस्कार कोकण विभागातून संजय सुरेश शिगवण (वाटद खंडाळा, रत्नागिरी) यांना प्रदान करण्यात आला.
पंचायतीचे दोन दिवसांचे राज्य अधिवेशन धाराशिव येथे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी सोलापूर महापालिकेेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, डॉ. लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे आणि राज्य सहसचिव सुरेश पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार शिगवण यांना देण्यात आला. वाटद येथे २० डिसेंबर १९८२ रोजी जन्मलेले शिगवण यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यानंतर ते मुंबईत नोकरीसाठी गेले. तेथे सुमारे १२ वर्षे नोकरी केल्यानंतर ते २०१२ साली गावी परत आले आणि टेम्पो वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. त्याला जोड म्हणून वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक पद्धतीने शेती सुरू केली. त्यात बदल म्हणून एसआरटी पद्धतीने शेती करत असताना जेएसडब्ल्यू शेतकरी समूहाशी परिचय झाला. हा समूह सेंद्रिय शेतीवर जास्त भर देत असल्याने त्या समूहाचा सदस्य होऊन त्यांनी पुणे तसेच बारामतीमध्ये प्रशिक्षण घेतले. नंतर पालेभाजी, कंदवर्गीय, वेलवर्गीय, फळवर्गीय, फुलवर्गीय, परदेशी, बहुवार्षिक, वनक्षेत्रीय पिकांबरोबरच विविध पारंपरिक अशी विविध पिके ते घेऊ लागले. शेतात १० गुंठ्यांवर शेडनेट बांधून विविध रंगांच्या भोपळी मिरचीचे भरपूर उत्पादन घेतले. एकरभर जमिनीमध्ये विविध प्रयोगातून त्यांनी साधलेल्या उन्नतीची दखल घेऊन ग्राहक पंचायतीने त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन गौरविले.
रत्नागिरी : ग्राहक पंचायतीचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार संजय शिगवण यांना प्रदान
