GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी माने यांच्यावर वैयक्तिक टीका नको : पालकमंत्री उदय सामंत

Gramin Varta
334 Views

रत्नागिरी : आगामी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रचार वेग घेत असताना, पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार शिवानी माने यांच्यावर कोणतीही वैयक्तिक टीका किंवा निंदानालस्ती करु नये, असा इशारा त्यांनी दिला.

सामंत म्हणाले, “महाविकास आघाडीचे तिकीट माझ्या मित्र आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्येला जाहीर झाले आहे. त्यामुळे आपल्या पक्षाच्या किंवा महायुतीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात एकही वाईट शब्द उच्चारला जाऊ नये.”

शनिवारी प्रभाग क्रमांक ५ मधून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर प्रभाग क्रमांक ६ मध्ये आयोजित सभेत बोलताना सामंत यांनी प्रचाराची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, “आपल्याला टीका-टिप्पणी नव्हे, तर विकासाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकायची आहेत. कुणावरही वैयक्तिक हल्ले करून मतं मिळवायची नाहीत.”

राजेश सावंत यांच्याशी असलेल्या जुन्या सहकार्याची आठवण करून सामंत म्हणाले, “राजेश सावंत हे आपल्या सोबत कॉलेजमध्ये होते. त्यांची मुलगी म्हणजे आपल्या घरातलीच मुलगी आहे, असं समजून प्रत्येक कार्यकर्त्याने पुढील २० दिवस स्वतःच्या तोंडाला कुलूप लावावं आणि केवळ विकासाचीच भाषा करावी.”

सभेला मोठी गर्दी जमल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं, “दोन-दोन तास लोक थांबतात, हे त्यांचं आपल्यावरील प्रेम आहे. त्यामुळे खालच्या दर्जाला जाऊन टीका करणे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांत मान्य होणार नाही,” असा ठाम इशारा सामंत यांनी दिला.

Total Visitor Counter

3374542
Share This Article