पित्याच्या उत्तरकार्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याला रत्नागिरी सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. दुर्वासने आपल्या वडिलांच्या, दर्शन पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तरकार्यासाठी जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बुधवारी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी दुर्वासचे तिन्ही खून प्रकरणांतील जामीन अर्ज निकाली काढले आणि त्याला जामीन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. दुर्वास पाटील याच्यावर त्याची प्रेयसी भक्ती मयेकर, तसेच सीताराम वीर आणि राकेश जंगम या तिघांच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे.
भक्ती मयेकर खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत, तर सीताराम वीर आणि राकेश जंगम यांच्या खुनाचा तपास जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडून होत आहे. पोलीस कोठडीनंतर दुर्वास पाटील सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सीताराम वीर यांच्या खून प्रकरणात दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि नंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने दर्शन पाटील यांनी सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला होता.
जामीन मिळाल्यानंतरही दर्शन पाटील यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर ३० सप्टेंबर २०२५ रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दुर्वासला न्यायालयाने यापूर्वीच परवानगी दिली होती. मात्र, पुढील उत्तरकार्य पूर्ण करण्यासाठी त्याला जामीन मिळावा म्हणून दुर्वासने सत्र न्यायालयात तीनही खून प्रकरणांत स्वतंत्र अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या तिन्ही जामीन अर्जांवर निकाल देताना ते फेटाळून लावले. तीन गंभीर खुनाचे गुन्हे दाखल असल्याने न्यायालयाने दुर्वास पाटीलला जामीन देण्यास नकार दिला आहे.