GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : आरे-वारे समुद्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू; अंत्यसंस्कार करण्याची वडिलांवर आली दुर्दैवी वेळ*

Gramin Varta
13 Views

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींसह त्यांचा जावई यांचा समावेश आहे. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेतील मृतांची नावे अशी आहेत – उज्मा शमसुद्दीन शेख (वय १८), हुसेरा शमसुद्दीन शेख (२०), जैनब जुनेद काझी (२८) आणि जैनब यांचे पती जुनेद काझी. सर्वजण ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील रहिवासी होते. काही दिवसांच्या सुट्टीसाठी ते रत्नागिरीत आले होते.

प्राप्त माहितीनुसार, १९ जुलै रोजी या चौघांनी दुचाकीवरून आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाण्याचे ठरवले. समुद्रात उतरताना पाण्याच्या खोलीचा आणि लाटांच्या तीव्रतेचा अंदाज न आल्यामुळे सर्वजण बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर या तिन्ही बहिणींचे वडील शमसुद्दीन शेख, जे नोकरीनिमित्त दुबईमध्ये वास्तव्यास आहेत, त्यांना तातडीने दुर्घटनेची माहिती देण्यात आली. ही शोकांतिक माहिती ऐकून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ते दुबईहून रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. मुलींचे वडील आल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, सर्व मृतदेह रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. ही दुर्घटना कुटुंबासाठी तसेच संपूर्ण समाजासाठी अतिशय वेदनादायक ठरली आहे.

समुद्रकिनारी पर्यटन करताना घ्या काळजी

शनिवारीच्या घटनेनंतर आरे-वारे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनारी येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे. समुद्र खवळलेला असताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Total Visitor Counter

2648853
Share This Article