GRAMIN SEARCH BANNER

पुणे क्रिकेट स्पर्धांमध्ये कळझोंडीचा सुपुत्र सुमित पवार चमकला

Gramin Varta
847 Views

गणपतीपुळे / वैभव पवार

पुणे जिल्ह्यातील आढे येथील मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या श्री भैरवनाथ चषक २०२५ फूल-पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नायगरा ११ संघाचा हुकमी एक्का सुमित पवार याने अफलातून कामगिरी करत मालिकावीर हा मानाचा किताब पटकावला. उत्कृष्ट फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर त्याने स्पर्धेत आपली छाप पाडली. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला हिरो होंडा (HF डिलक्स) दुचाकी व भव्य चषक प्रदान करून गौरविण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावचा सुपुत्र असलेल्या सुमित पवारने लहानपणापासूनच क्रिकेटची गोडी जोपासली. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या स्पर्धांपासून ते शाळा-महाविद्यालयीन मैदानांवर सातत्याने मेहनत घेत त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला. आक्रमक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीने अनेक नामांकित संघांना त्याने पराभवाची चव चाखवली आहे. गेल्या वर्षी “मावळचा मावळा” म्हणून आमदार चषक जिंकत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव मावळ तालुक्यातील एक सुप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुमितने पुण्यासारख्या मोठ्या शहरातही क्रिकेटप्रेमींच्या मनात खास स्थान मिळवले आहे. श्री भैरवनाथ चषक २०२५ चा मालिकावीर घोषित होताच पुणे जिल्ह्यातील मावळ-आढे परिसरासह रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावात आनंदोत्सव साजरा झाला. क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत त्याच्या या यशाला विजयी सलामी दिली.

सुमित पवारच्या या कर्तृत्वाबद्दल रत्नागिरी, पुणे, मुंबई, सावंतवाडी आणि कोल्हापूर विभागातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कळझोंडीचा हा युवा खेळाडू आगामी काळात आणखी उंच भरारी घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3199275
Share This Article