GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर एस.टी. स्टॅण्डजवळ बेकायदेशीर माती उत्खनन; ५० ब्रासची परवानगी असताना १५०० ब्रास उत्खनन

Gramin Varta
349 Views

3 – 4 घरांना धोका, पावसाळ्यात कोसळण्याची भीती, प्रवाशांच्या जीवालाही धोका, प्रशासन मात्र सुस्त

संगमेश्वर : शहरलगतच्या नावडी परिसरात मुंबई–गोवा महामार्गालगत आणि संगमेश्वर एस.टी. स्टॅण्डच्या अगदी शेजारीच प्रचंड प्रमाणात अनधिकृत माती उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 50 ब्रासची परवानगी असताना 1500 ब्रास माती उत्खनन केले जात असल्याचा गंभीर आरोप मनोज साठ्ये यांनी केला आहे. या माती उत्खननामुळे 3 ते 4 घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही घरे कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. किंवा जीवितहानी होण्याची शकता आहे. एवढेच नव्हे तर बाजूलाच एस. टी स्टँड असल्यामुळे इथे उभ्या राहणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास ही धोका निर्माण झाला आहे. याबाबत मनोज साठ्ये यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी, खणीकर्म विभाग, संगमेश्वर तहसिलदार, माभाळे मंडळ अधिकारी, संगमेश्वर पोलिस यांना निवेदन दिले आहे. तातडीची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, स्टँड जवळ होत असलेल्या माती उत्खननामुळे परिसरातील रहिवासी घरे तसेच दररोज हजारो प्रवासी वापरत असलेला एस.टी. स्टॅण्ड थेट धोक्यात आला आहे. नावडी येथील स.नं. १७/७/१/अ/२६ब ही जमीन मूळतः टेकडीसारखी उंच असून, ती संगमेश्वर (नावडी) एस.टी. स्टॅण्ड व मुंबई–गोवा महामार्गालगत आहे. या ठिकाणी निढळे वाडी येथील ठेकेदार यांनी केवळ ५० ब्रास माती उत्खननाची परवानगी घेतली असताना प्रत्यक्षात तब्बल १५०० ब्रासपेक्षा अधिक मातीचे उत्खनन केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या बेकायदेशीर उत्खननामुळे संभाजीनगर परिसरातील ३ ते ४ घरे थेट धोक्याच्या छायेत आली असून, कोणत्याही क्षणी टेकडीची माती घसरून खाली येण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः एस.टी. स्टॅण्ड परिसरात दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी झालेल्या उत्खननामुळे प्रवाशांचे जीवित आणि सार्वजनिक मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

आगामी पावसाळ्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रकरणाची खणीकर्म विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी करावी, उत्खनन तात्काळ थांबवावे तसेच दोषींवर कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महामार्गालगत आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आसपास अशा प्रकारचे बेकायदेशीर उत्खनन कसे सुरू आहे, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Total Visitor Counter

3366959
Share This Article