पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालाबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते ८ जुलै, तर बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते २६ जुलै या कालावधीत घेण्यात आली.
दहावीच्या परीक्षेसाठी ३४ हजार ५६२, तर बारावीच्या परीक्षेसाठी ६८ हजार ९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर आयोजित करण्यात आली.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाबाबतची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (२९ जुलै) जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर ३० जुलैपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळामार्फत ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाद्वारे अर्ज आणि शुल्कही ऑनलाइन भरता येणार आहे.
जून-जुलै २०२५च्या दहावी, बारावीची परीक्षा सर्व विषयांसह देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२६, जून-जुलै २०२६ आणि फेब्रुवारी-मार्च २०२७ या तीन संधी उपलब्ध राहतील. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार अंतर्गत, तसेच आयटीआयद्वारे श्रेयांक हस्तांतरण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता होणार जाहीर
