GRAMIN SEARCH BANNER

राजापूर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी विनय गुरव बिनविरोध

Gramin Varta
209 Views

महाविकास आघाडीचा विजय; स्वीकृत सदस्यपदी महेश शिवलकर व सुभाष बाकाळकर यांची नियुक्ती

राजापूर : राजापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महायुतीकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक विनय गुरव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. याचवेळी स्वीकृत सदस्य म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, तर महायुतीच्या वतीने माजी नगरसेवक सुभाष शाम बाकाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या राजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी दहा जागा मिळाल्या होत्या. मात्र अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत माजी नगराध्यक्षा व माजी विधानपरिषद सदस्या सौ. हुस्नबानू खलिफे यांना लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आणले होते.

नगराध्यक्षपदासह एकूण अकरा जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली आहे. सत्तास्पर्धा संपल्यानंतर उपनगराध्यक्षपद व स्वीकृत सदस्यपदांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. नगराध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याने उपनगराध्यक्षपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार, हे जवळपास निश्चित होते. त्यानुसार मंगळवारी राजापूर नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ. खलिफे होत्या. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अभिजीत पुंभार, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव तसेच सर्व नवनियुक्त नगरसेवक उपस्थित होते.

उपनगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने नगरसेवक विनय गुरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोणताही अर्ज न आल्याने गुरव यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्यपदी महाविकास आघाडीच्या वतीने महेश शिवलकर आणि महायुतीच्या वतीने सुभाष बाकाळकर यांच्या नावांची घोषणा नगराध्यक्षा सौ. खलिफे यांनी केली.

यानंतर उपस्थित सदस्यांना संबोधित करताना नगराध्यक्षा सौ. खलिफे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्वांनी एकत्रितपणे, सलोख्याने काम करून राजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महायुतीचे गटनेते ॲड. राहुल तांबे, महाविकास आघाडीचे गटनेते व माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, ज्येष्ठ नगरसेवक सौरभ खडपे, सुबोध पवार आदींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नगराध्यक्षा सौ. खलिफे यांनी विनय गुरव यांना उपनगराध्यक्षांच्या दालनात नेऊन अधिकृत आसनावर विराजमान केले. यानंतर माजी आमदार गणपतराव कदम, जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरव यांचे अभिनंदन केले.

Total Visitor Counter

3072720
Share This Article