जयगड : जयगड उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हाजी आंजुम इब्राहीम होडेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा आज शाळा व्यवस्थापन समिती आणि मुस्लिम एज्युकेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक संपन्न झाला. याप्रसंगी होडेकर सरांच्या १७-१८ वर्षांच्या समर्पित सेवेचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठण आणि नात पठणाने झाली, ज्यामुळे सभागृहात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सौ. फरजाना आसलम डांगे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुस्लिम एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मुश्ताक युनूस टेमकर, महमद हुसैन मुजावर, माजी ग्रामपंचायत सदस्य साजीद जांभारकर, जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे संचालक मा. श्री. मुश्ताक शरीफ टेमकर, मुस्लिम एज्युकेशन संस्थेचे संचालक हिदायत होडेकर, तसेच ताहफीजुल कुर्आन मदरसाचे सर्व हाफीज मंडळी उपस्थित होते.
होडेकर सरांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या मनोगतांनी सभागृह भारावून गेले. अध्यक्ष तोसिफ पांजरी सरांनी आपल्या भाषणात होडेकर सरांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “हाजी आंजुम सर गेली १७-१८ वर्षे जयगड उर्दू शाळेच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते, त्यापैकी १०-११ वर्षे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहिले. शाळेच्या कोणत्याही अडचणींवर ते खंबीरपणे उभे राहायचे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला नवा आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी सहजपणे भरून निघणार नाही.” हे बोलताना तोसिफ पांजरी सरांना भावना अनावर झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.
मुस्लिम एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. मुश्ताक युनूस टेमकर यांनीही आंजुम सरांसारखा निःस्वार्थ शिक्षक मिळणे कठीण असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “शाळेच्या इमारत दुरुस्तीपासून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सतत सक्रिय असणारे हे व्यक्तिमत्त्व एक आदर्श शिक्षक ठरले आहे. त्यांच्या कार्याची आठवण आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील.”
शाळेतील विद्यार्थ्यांनी भावपूर्ण भाषणे आणि विविध सादरीकरणे करून आपल्या लाडक्या मुख्याध्यापकांप्रती आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांमार्फत त्यांना भेटवस्तूही देण्यात आली. शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि ग्रामस्थांनीही पुष्पगुच्छ, शाल आणि उपहार देऊन होडेकर सरांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.
या सोहळ्याला जमातुल मुस्लिमीन, वाडी प्रमुख, शाळा समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मो. साखर, मो. राहत, मो. आकबर, मो. शम्स, मो. आझाद, मो. दखनी अशा अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. होडेकर सरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “शाळा म्हणजे माझं दुसरं घरच होतं. इथल्या आठवणी, विद्यार्थी, सहकारी आणि हा परिसर, हे सर्व मी माझ्या मनाच्या गाभ्यात साठवून ठेवतो. सेवानिवृत्ती म्हणजे पूर्णविराम नाही, तर एक नवा अध्याय आहे.”
हा कार्यक्रम केवळ एका सेवानिवृत्त शिक्षकाचा निरोप नव्हता, तर निष्ठा, सेवाभाव आणि ज्ञानदायतेचा महिमा दडलेल्या एका युगाचा निरोप होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. आसमा खान यांनी केले आणि शेवटी शाब्दिक आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.