रत्नागिरी : शहरातील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर एका प्रेमी युगुलाचे अश्लील कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे रत्नागिरीत संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य घडल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही दोघ विवाहित असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युगुल किनाऱ्यावरील दगडांच्या आडोशाला अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. परिसरात इतर पर्यटक व स्थानिक नागरिक उपस्थित असतानाही या दोघांना भान नसल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे, त्यांच्या कृतीचे चित्रीकरण होत असल्याची त्यांना कल्पनाही नसल्याचे समोर येत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रत्नागिरीसारख्या सांस्कृतिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहराच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. भाट्ये समुद्रकिनारा हा कुटुंबांसह पर्यटकांचा आवडता ठिकाण असल्याने अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्याबाबतही संयम बाळगण्याचे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखणे आणि सामाजिक मूल्यांचे भान ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







